बुलडाणा,(प्रतिनिधी)- दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्यावतीने ४, ५ व ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी महिला उद्योजक तथा बचतगट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. येथील मलकापूर रोडवरील एआरडी सिटी मॉलच्या मागे, बुलडाणा रेसिडेन्सीसमोरील मैदानात सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या बचतगट प्रदर्शनीचा उद्धाटन समारंभ होणार आहे, या आयोजित कार्यक्रमाची माहिती आज २ ऑक्टोंबर रोजी बुलडाणा रेसिडेन्सी येथे पत्रकार परिषदेत दिशा महिला बचत गट फेडरेशन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई शेळके यांनी दिली.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन अंतर्गत गेल्या 10 वर्षा पासून महिला बचत गट महिलांना याचा लाभ मिळावा, सोबतच त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी हातभार लागावा यासाठी नेहमी अग्रेसर आहे, असेही सांगितले. फक्त कोरोना काळातील दोन ते तीन हे वर्ष सोडून सतत बचत गट प्रदर्शनीचा कार्यक्रम सुरू आहे.
या प्रदर्शनीचे उद्घाटन राष्ट्रवादी महिल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.रोहिणीताई खडसे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य प्रवक्ता तथा सरचिटणीस मा.हेमलताताई पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष कोमलताई झंवर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव स्वातीताई वाकेकर, मिनलताई आंबेकर, विजयाताई रामेश्वर खडसान शिवसेना उबाठा महिला जिल्हाध्यक्षा , महिला उद्योजिका सीताबाई मोहिते यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने महिला उपस्थितीत राहणार आहेत.
२५० स्टॉल असणार उपलब्ध :
बुलडाणा येथे आयोजित तीन दिवसीय बचतगट प्रदर्शनीत जवळपास २५० स्टॉल लावण्यात येणार आहेत. खाद्यजत्रा, हस्तकला वस्तू हस्तशिल्प, घरगुती पदार्थ व मसाले, महिला गृहउद्योग उत्पादित वस्तू, महिलांचा स्नेहमिलन सोहळा, महिलांचा आनंदोत्सव, महिला उद्योजकांचा गौरव समारंभ असे या प्रदर्शनीचे वैशिष्ट्ये आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने ही बचटगट प्रदर्शनी महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
समाजप्रबोधनकार प्रविणजी दवंडे यांचे किर्तन ठरणार आकर्षण :
बचतगट प्रदर्शनीत तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. प्रसिद्ध समाज प्रबोधनकार पवनजी दवंडे यांचा प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी ते आपल्या वाणीतून करणार आहेत.
कौटुंबिक जीवनातील विविध प्रसंग, देश-समाजातील इतर समस्या, अधूनमधून विनोदाची पेरणी करत कीर्तनात सादर करत असतात. त्यांच्या कीर्तनाला महिला आणि तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असतो. सामाजिक जनजागृतीसाठी हा लोकोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच इतरही कार्यक्रम यादरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केले आहे.