https://vruttamasternews.com/buldhana-news-10/
बुद्धभूमी भोन येथे दरवर्षी बुद्ध महोत्सव साजरा करा – डॉ. सिद्धार्थ मेश्राम
भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून बुद्ध महावंदना,व्याख्याने , संगीत आणि स्तूप पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन
संग्रामपूर (का. प्र. ) जवळील भोन गावात यंदा बुद्ध पौर्णिमा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून भोन गावातील स्तूप स्थळ परिसरात बुद्ध महावंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती लावत तथागत गौतम बुद्धांच्या 2300 वर्ष जुन्या सम्राट अशोक कालीन स्तूप स्थळाला अभिवादन केल आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भोन या गावात सम्राट अशोककालीन 2300 वर्ष जुना बुद्ध स्तूप आढळून आला आहे. सम्राट अशोककालीन या बुद्ध स्तूप स्थळ परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते स्तूप स्थळ परिसरात भंते संघपाल यांनी बुद्ध महावंदना केली. यासोबतच मान्यवरांच्या व्याख्यानासह मिलिंद डोंगरदिवे यांचा प्रेरणा कला संच च्या माध्यमातून बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावणाऱ्या नागरिकांना भोन येथील ऐतिहासिक वारशाची माहिती व्हावी यासाठी पोस्टर प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, संचालक ट्रॅव्हल्स अँड टुरिझम तथा प्रोफेसर पुरातत्व विभाग नागपूर विद्यापीठ यांनी भोन येथील स्तूप तसेच सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या ८४ हजार स्तूपाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आलेले प्रा. डॉ. संतोष बनसोड, माजी अधिष्ठाता, इतिहास अभ्यास मंडळ अमरावती विद्यापीठ, यांनी भोन येथील स्तूपाच्या इतिहासाचे अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला असल्याचं सांगत, भोन येथील स्तूप आणि सम्राट अशोकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय स्तूप व लेणी संवर्धन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भोन स्तूपाच्या उत्खननाच्या वेळी घडलेल्या घटनाक्रमाचा आढावा घेत स्तूपाच्या निर्माणासाठी गेल्या अनेक वर्षापासून करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देत दरवर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त भोन येथे बुद्ध महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष राजदत्त अलोने यांनी केले, सूत्रसंचालन समितीचे कोषाध्यक्ष जी. एन. ब्राह्मणे यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीचे सचिव प्रा. प्रफुल खंडारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे सह सचिव महेंद्र बोर्डे, सदस्य सुरेश वानखडे, शेत मालक श्रीकृष्ण इंगळे, सुदर्शन अजने, राहुल खंडारे(पत्रकार), सुनीता मेश्राम, विमल ब्राह्मणे, सोहम धुरंदर, संतोष तायडे, अनिल इंगळे, बी. के. मोकळे यांच्या सह भोन येथील गावकऱ्यांनी मेहनत घेतली.