जाफराबाद/ प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात पासोडी शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली.
पासोडी – अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड,
राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना,
सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक आहेत.
रवींद्र आनंद या ठेकदाराचे हे काम सुरु आहे. या कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी या उद्देशाने ठेकेदार रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करून टाकत होता.
ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
पहाटे साडेतीन वाजता ही घटना घडली असता जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतकांचे शव ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक गावकऱ्यांनी पंचनामा न करता शव ताब्यात घेऊ नये असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. अवैध वाळूचा विषय असल्याने महसूल पथकालाही पाचारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरिक्षक इंगळे यांनी दिली.
राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकार्यांया आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत.
-… सुरेश खंदाडे