https://vruttamasternews.com/education-news/
जिल्हा परिषद शाळांचे परिवर्तनशील रूप अधोरेखित करून या शाळांचे महत्त्व रेखाटनारा उज्वलकुमार यांचा हा लेख जरूर वाचा व पुढे अग्रेषित करा.
“गुणवत्तापूर्ण दर्जेदार जिल्हा परिषद शाळा”
महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये साधारणता जून महिन्याच्या मध्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते. ग्रामीण आणि निमशहरी पालकांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा त्यांच्या पाल्यांसाठी आकर्षणाच्या केंद्र ठरत आहेत, हे आशादायी चित्र आहे.गेल्या काही वर्षात या सरकारी शाळांनी आपल्यामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. जिल्हा परिषद शाळांच्या बहुसंख्य शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळांचा संपूर्ण कायापालटच केला आहे. वाडी,वस्त्या,तांड्यावरील शिक्षकांसह ग्रामीण भागातील शाळेतील शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या रुपयातून खर्च करून या शाळांमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत.संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक डिजिटल झालेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत,ही महाराष्ट्र राज्यासाठी भूषणावह बाब आहे.ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थी आज जिल्हा परिषद शाळांमधून संगणकीय शिक्षण घेऊन शहरी विद्यार्थ्यांपेक्षा टेक्नोसॅव्ही होत आहेत.विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन स्पर्धेत उतरत आहेत.जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक शालेय अभ्यासा सोबत सांस्कृतिक, क्रीडा,साहित्य आणि वैज्ञानिक क्षेत्रातील वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करीत आहेत. मातृभाषेतून शिक्षण देतांना इंग्रजी भाषेचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या बनल्या आहेत. याशिवाय मध्यान्ह भोजन योजना,मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश,डिजिटल क्लासरूम,निसर्गरम्य परिसर, आकर्षक रंगरंगोटी, आल्हाददायक वातावरण,विविध स्पर्धा परीक्षांची तयारी यामुळे जि. प. शाळा वैशिष्टपूर्ण बनलेल्या आहेत.यामुळे पालकांचा आपल्या पाल्यासाठी जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढतो आहे.एकंदर जिल्हा परिषद शाळांमधील मिळणाऱ्या दर्जेदार सुविधा,गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच प्रवेश द्यावा,ही मनोमन अभिलाषा.
@ उज्वलकुमार.
छत्रपती संभाजीनगर.