https://vruttamasternews.com/sambhaji-nagar-news-3/
माधवराव बोरडे यांनी वंचितासाठी शिक्षणाची दारे खुली केली, न्यायाधीश, विजयकुमार गवई यांचे गौरवद्गगार.
———————————-
निळे प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आयोजित, महाकवी वामनदादा कर्डक, शिक्षण महर्षी माधवराव बोरडे जयंती उत्साहात साजऱी.
————————-
२५ जणांना “शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पुरस्कार” देऊन केले सन्मानित.
प्रतिनिधी / छत्रपती संभाजीनगर
दिनांक – १५. ०८. २०२४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला समजावून सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे यांनी वंचित उपेक्षितासाठी शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन मुंबईतील अंधेरी येथील न्यायालयाचे न्यायाधीश, विजयकुमार गवई यांनी केले. यावेळी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या प्रबोधन कार्याचाही त्यांनी गौरव केला. महाकवी वामनदादा कर्डक व शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे यांच्या संयुक्त जयंती निमित्त, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणिजन व्यक्तींना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एकूण २५ जणांना शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे पुरस्कार देवून सम्मानित करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी मौलाना आझाद संशोधन सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान, प्राचार्य यशवंत खडसे यांनी भूषवले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून, न्यायाधीश, विजयकुमार गवई पुढे बोलताना म्हणाले की, महाकवी वामनदादांनी प्रबोधन केले. माधव बोरडे यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य केले या दोघांचेही कार्य महान आहे, असे गवई यांनी सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे जी कोटी कुळे उद्धरली ती कुळे पुन्हा गुलामगिरीत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. महाकवी वामनदादा हे नवनिर्मिताचे विद्यापीठ होते. त्यांचे कार्य कोणीही विसरू शकणार नाही. माधवराव बोरडे यांनी शिक्षण संस्था तर उभी केली,शिवाय त्यांनी दानशूर वृत्तीचेही दर्शन घडवले. ते वास्तवाचे भान बाळगणारे शिक्षण महर्षी होते असे डॉ. कांबळे यांनी स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,एकत्र येऊन केलेल्या कार्याचा निष्कर्ष काय? आपण काय साध्य केले, यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. हे आपण तपासले पाहिजे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीमुळेच देश स्वतंत्र झाला.असे रगडे यांनी स्पष्ट केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळाले. हे त्रिवार सत्य आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी सुध्दा आपले विचार मांडले. महाकवी वामनदादा कर्डक यांनी गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवला, दुबळ्याला बळ दिलं, त्यांच्या गीतातून अन्यायाविरुद्ध भीमसैनिक पेटून उठला असेही ते म्हणाले.
तळेगाव दाभाडे येथील नगराध्यक्ष,अँड.रंजनाताई भोसले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तळेगाव दाभाडे येथील समाजकंटकाने बळकावलेले निवासस्थान मुक्त करण्यासाठी मी १९८८ ते २०१२ या काळात संघर्ष केला. त्या ठिकाणी मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करायचे आहे. त्यासाठी मला सर्वांनी साथ द्यावी,असे आवाहन रंजनाताई भोसले यांनी केले. या आव्हानाला प्रतिसाद देत अँड धनंजय बोरडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या होऊ घातलेल्या स्मारकासाठी ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानचे अँड.धनंजय बोरडे म्हणाले की, शिक्षणमहर्षी माधव बोरडे यांचा कार्याचा वारसा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहे. पत्रकार, विद्यार्थी, गरजूंना मदत करण्याचे धोरण आम्ही राबवणार आहोत. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्तवीकात संपादक रतनकुमार साळवे म्हणाले की, महाकवी वामनदादा कर्डक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गीतातून घराघरात पोहोचवले, तर तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षणाचे महत्त्व पटलेले शिक्षण महर्षी माधव बोर्डे यांनी संस्था उभे केल्या, गोरगरीब शेतमजूर वाड्या तांड्यावरील शिक्षणापासून वंचित असलेले विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून जयंतीनिमित्त गेले दोन वर्षापासून जयंती सोहळ्याचे आयोजन करत आहोत. समाजातील गुणिजन व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. हे कार्य निळे प्रतीक संस्था नियमित सुरू ठेवणार असल्याचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी सांगितले. पंकज शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रतीक साळवे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निळेप्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.