रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

सिदखेडराजा, (प्रतिनिधी ता.७) :- सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजात गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले हॊते. दरम्यान शासनाने या आंदोलनाची दखल घेतली असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. ना.पवार व संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला रविकांत तुपकर यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले असून प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविकांत तुपकरांना बैठकीच्या निमंत्रणाचे लेखी पत्र दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीसाठी मध्यस्थी केली आहे. शासनाने आंदोलनाची दखल घेऊन तुपकरांना चर्चेसाठी बोलाविले आहे, त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थळी उपस्थित महिलांच्या हस्ते व माँसाहेब जिजाऊ चरणी नतमस्तक होत आपले अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित केले. बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू, जर ठोस निर्णय झाले नाही तर राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

मातृतीर्थ सिंदखेड राजात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे आंदोलन गेल्या ४ दिवसांपासून सुरू होते. सोयाबीन – कापसाची दरवाढ, पीक विम्याचा प्रश्न, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, जंगली जनावरांपासून शेतीपिकांचे रक्षण यासह विविध मुद्यांवर तुपकरांनी हे आंदोलन सुरू होते. आज ७ सप्टेंबर रोजी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातल्या शेकडो गावात व राज्यातील हजारो गावांत तुपकर यांच्या समर्थनार्थ ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात आले. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा असून शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे ठराव विविध ग्रामपंचायतीने घेतले आहेत. तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली असतांनाही सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. ८ सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन असल्याने परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान आज सायंकाळी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी रविकांत तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून खुद्द उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी रविकांत तुपकर यांना 11 सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीचे लेखी निमंत्रण जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी खडसे यांनी रविकांत तुपकर यांना दिले. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली हे आंदोलनाच्या आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश आहे. केवळ आंदोलन करणे आणि कायदा हाती घेणे हा आपला उद्देश नसून शेतकऱ्यांच्या पदरात त्यांच्या न्याय हक्क मिळवून देणे हा आपला उद्देश असल्याने आपण उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून आपल्या आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले. जिजाऊंच्या या पावनभूमीत आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या माय- माऊलींच्या हस्ते दूध घेऊन तुपकरांनी आपले अन्यत्याग आंदोलन तोडले. ११ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत काय निर्णय होतात आणि कोणत्या कोणत्या मागण्या मार्गे लागतात हे पाहूनच पुढील निर्णय घेऊ तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी शांत रहावे, जर ठोस निर्णय झाले नाही तर आक्रमकपणे रस्त्यावर उतरू असे रविकांत तुपकर यांनी सांगितले

 

आ.डॉ.राजेंद्र शिंगणे व विविध नेत्यांची आंदोलन स्थळी भेट

 

राज्याचे माजी मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रविकांत तुपकर यांच्याशी चर्चा केली. रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागण्या ह्या रास्त असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी चर्चा करू असे, आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. रविकांत तुपकर राज्यातील शेतकऱ्यांचा आवाज आहे, त्यामुळे त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला. तसेच माजी आमदार तॊताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके,ज्योतीताई खेडेकर, प्रा.नरेश बोडखे, यांनी आंदोलन स्थळी पोचून रविकांत तुपकर यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *