देऊळगाव राजा / राजु भालेराव देऊळगाव राजा तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय, पिंपळगाव बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी ८ व ९ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत धावण्याच्या स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. या विद्यालयातील चार विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींनी यश मिळवत जिल्हास्तरावर निवड मिळवली आहे. श्री शिवाजी विद्यालय, पिंपळगाव बुद्रुक हे तालुक्यातील एक नामांकित विद्यालय असून गेल्या चार वर्षांपासून शाळेचा निकाल शंभर टक्के आला आहे. खेळ, क्रीडा आणि संस्कारांमध्ये हे विद्यालय सदैव आघाडीवर असते. या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. या विद्यालयाचे विजयी विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत: कृष्णा शिंदे (अंडर १४) – द्वितीय क्रमांक, पवन खरात (४०० मीटर, अंडर १४) – द्वितीय क्रमांक, अतुल मांटे (४०० मीटर दौड, अंडर १७) – द्वितीय क्रमांक, हर्षल चित्ते (२०० मीटर रनिंग) – द्वितीय क्रमांक, शाहरुख पठाण (४०० मीटर रनिंग) – तृतीय क्रमांक.
या विद्यालयातील विद्यार्थिनीही कमी नाहीत. धावण्याच्या स्पर्धेत अनुसया सरोदे (अंडर १९) – प्रथम क्रमांक, आणि अक्षरा नागरे (अंडर १४) – प्रथम क्रमांक मिळवले आहे. सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य सुरळीकर सर आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले आहे. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे, सचिव प्रेमराज भाला व इतर संचालकांनीही विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.