विठ्ठल पार्वती अर्बन पत संस्थेच्या वतीने 45 माजी सैनिकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा संपन्न.

चिखली / सिद्धार्थ पैठणे :-  विठ्ठल पार्वती अर्बन पतसंस्था मेरा खुर्द यांच्या वतिने मेरा खुर्द येथील देशमुख फंक्शन लॉन वर अंत्री -मेरा, देऊळगाव घुबे-भरोसा , अंचरवाडी -शेळगांव अटोळ ,कोनड -अमोना व ईसरुळ-मंगरुळ परिसरातील सेवा निवृत्त सैनिकांचा भव्य -दिव्य असा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेनफडराव घुबे, प्रमुख अतिथी म्हणून मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रामेश्वर पाटील डुकरे,शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते एकनाथ पाटील थुट्टे, चिखली क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश थुट्टे, माजी संचालक प्रकाश पाटील घुबे, मेरा बु. येथील सेवानिवृत्त सुरक्षा अधिकारी अशोकराव पडघान, मेरा खुर्द चे सरपंच रमेश अवचार,सेवानिवृत्त आर्डिनरी लेफनंन्ट दिनकरराव डोंगरदिवे , फारुक शेठ देशमुख हे उपस्थित होते.

सर्व प्रथम परंमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर खंडाळा मकरध्वज येथील नुकतेच शहिद झालेले विर जवान विजय जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. उद्धव घुबे यांनी करीत असताना कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका मांडली. त्या नंतर उपस्थित सेवानिवृत्त शुर वीरांचा सन्मान चिन्ह ,शाल व पुष्प गुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथी पदावरून बोलताना रामेश्वर पाटील यांनी कार्यक्रमाची आखणी म्हणजे ज्या शुरविरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांचे स्मरण व जे आज उपस्थित आहेत , ज्यांचा आज गौरव करण्यात आला त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही सुंदर संकल्पना होय असे म्हणून विठ्ठल पार्वती अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष उद्धवराव घुबे व त्यांचे सर्व सहकारी यांचे तोंडभरून कौतुक केले. या मागे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेनफडराव घुबे यांची प्रेरणा असून हे कुटुंब या परिसरातील सेवाभावी कुटुंब असून दरवर्षी त्यांच्या संकल्पनेतून जनहितार्थ वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते ही आपल्या सर्वांसाठी भूषणावह बाब आहे असे पाटील म्हणाले. सिमेवर लढून देशाची सेवा करताना प्रचंड त्याग व या शुरविरांच्या बलिदानातून हा देश घडतो, म्हणून या शूर जवानांच्या समस्यांची जाण समाजाने ठेवणेही गरजेचे असल्याचे मत पाटील यांनी प्रतिपादन केले.

जेष्ठ सैनिक म्हणून भावराव घुबे यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या युद्धातील आठवणींना उजाळा दिला तेव्हा उपस्थित सर्वांच्या अंगावर शहारे आले व रोमांच उभे राहिले. सत्कार मुर्ती दिनकरराव डोंगरदिवे यांनीही 1965 , 1971 मधील लढायांमध्ये घडलेल्या आठवणींना उजाळा देऊन सैनिक हा मातृभुमीची व देशाची निरागसपणे सेवा करीत असतो पण शासन मात्र सेवानिवृत्त सैनिकांच्या अडीअडचणी कडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत व्यक्त केली. त्र्यंबकराव डोंगरदिवे यांनी आपल्या भाषणातून शेनफडराव घुबे साहेब व मी बालाजी साखर कारखान्याचे सेवेत असताना तेथे असलेली त्यांची कार्य तत्परता व आजही त्यांच्या कामाचा आवाका तेवढाच कायम असून त्यांची सेवाभावी वृत्ती ही समाजाला दिशा देणारी असल्याचे भावोद्गार डोंगरदिवे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्ष पदावरून बोलताना शेनफडराव घुबे यांनी जवानांच्या शौर्याची व त्यागाची सतत पुजा व्हावी. समाजामधे सेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान राखला जावा अशी अपेक्षा व्यक्त करुन कोणत्याही अडीअडचणींच्या प्रसंगी माझे सहकार्य राहील अशी भुमिका व्यक्त केली.या प्रसंगी भावनात्मक होऊन त्यांनी नुकतेच शहिद झालेले वीर जवान विजय जाधव व मागील वर्षी शहिद झालेले वीर जवान अक्षय गवते यांच्या स्मृतीला ऊजाळा देऊन त्यांच्या माता पित्यांची किंवा शहिदांच्या पत्नींची किती बिकट अवस्था असेल? असा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. शालेय जीवनात लष्करात जाण्याची कल्पना माझ्याही डोक्यात होती परंतु ती आमलात आणता आली नाही., तरी पण शाळेच्या माध्यमातून 1000 सैनिक निर्माण करुन देशाला देण्याची भुमिका माझ्याकडून निसर्गाने पार पाडून घेतली तेव्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या. आज रोजी जानकी देवी विद्यालयाचे 1000 जवान देशाच्या सैन्यदलात तर 1000 तरुण पोलीस दलात सेवेत कार्यरत असून माझ्या जीवनातील सर्वात मोठी ऊपलब्धी असल्याचे मत शेनफडराव घुबे यांनी मांडले. आयोजकांनी यापेक्षाही मोठा सैनिकांचा सपत्नीक सन्मान सोहळा आयोजित करावा अशी सूचना करुन पतसंस्थेचे अध्यक्ष उध्दव घुबे, उपाध्यक्ष दिपक घुबे, संचालक अनिल निंभोरे, संदीप लव्हाळे, दिपक शिंगणे, झ्यामसिंग राठोड, हरिदास घुबे,संजीव सावळे,अमोल घुबे, शरद लंबे,मोतीराम नवले,रेखा घुबे,पुनम घुबे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे व कर्मच्याऱ्यांचे कौतुक केले

या प्रसंगी मेरा खुर्द येथील जेष्ठ शेतकरी संघटना नेते अमानुल्ला खासाब व शेख सुलतान भाई तसेच अंत्री खेडेकर येथील यशोदा फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष संजय खेडेकर यांचाही ह्रद्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक दिपक उदार, सिद्धेश्वर घुबे, कोमल काळे, संदिप घुबे यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य तथा संचालक हरिदास घुबे यांनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग समाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी व महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *