https://vruttamasternews.com/buldhana-news-15/
मावस बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावली दहा वर्षाची शिक्षा.
देऊळगाव राजा /प्रतीनीधी
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गावात २०१६ मध्ये घडला होता प्रकार. अज्ञानी असलेल्या मावस बहिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारिरीक संबंध ठेवणाऱ्या आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या हवसखोर भावाला बुलढाणा न्यायालयाने दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी भक्कमपणे केलेला युक्तीवाद प्रकरणाला बळ देणारा ठरला. फिर्यादीने पो.स्टे. अंढेरा येथे ३ जून २०१६ रोजी फिर्याद दिली की अंदाजे वीस ते पंचवीस दिवसापूर्वी ते घरी झोपलेले असतांना त्यांची मुलगी (वय १६ वर्षे) पिडीता ही घरात आढळून आली नाही. तसेच त्यावेळी त्याच्या मोबाईलवर आरोपी रंजीत किसन पारवे (रा. लोणीखुर्द, ता. रिसोड, जि. वाशिम) याचा फोन आलेला दिसला वरून त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या नातेवाईकांनी फिर्यादीला सांगीतले की, तिच्या मुलीस आरोपीने लग्न करण्याकरिता पळून घेवून गेला आहे. अशी माहिती मिळाल्याने फिर्यादीने आरोपीविरूध्द त्याच्या मुलीस फुस लावून पळून
नेल्याबद्दल अशा तोंडी रिपोर्ट व जबाबवरून पो.स्टे. अंढेरा यांनी कलम 363, 366.ए. 376 जे, भांद्विनुसार व सह कलम 3, 4 नुसार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मुंढे
यांनी करून आरोपीविरूध्द भरपूर पुरावा मिळून आल्यामुळे दोषारोपपत्र बुलडाणा येथील विशेष न्यायालयामध्ये दाखल केले. तपासात आढळून आले होते की, रंजीतने पिडीतेला तिच्या घरामागे बोलाविले होते. नंतर मोटारसायकलवर ते आधी लोणीला गेले. नंतर रिसोड आणि तेथून वाशिम याठिकाणी पोहोचले. तेथून रंजीतने पिडीतेला पंढरपूरला घेवून गेला होता. त्याठिकाणी ते एक महिना राहिले. दरम्यान आरोपीने तेथील द्राक्षबागामध्ये मजूरी केली. दोघांनी लग्नही केले होते, असे समजते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. त्यानंतर सदरचे प्रकरण हे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांचेकडे सरकारपक्षाची बाजू मांडण्याकरीता सोपवण्यात आलें सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांनी सरकार पक्षाची भक्कम बाजू मांडून न्यायालयामध्ये फिर्यादीने दिलेल्या फिर्याद नुसार संपूर्ण हकीकत सिध्द केली. तसेच आरोपीने पिडीता ही तिची मावस बहिण असतांनासुध्दा तिला लग्नाचे अमिष दाखवून पळून नेले व तिच्या सोबत जबरदस्ती शारिरीक संबंध केले. सदर प्रकरणामध्ये पिडीताची आई व
पिडीता फितूर झाल्या त्यांनी त्यांच्या बयाणानुसार साक्ष दिली नाही. परंतू त्यांच्या उलटतपासामधून आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होईल इतपत पुरावा मिळून आला. त्यामुळे आर. एन. मेहरे, जिल्हा व सत्र न्यायाधीश-1, बुलडाणा यांनी आरोपीविरूध्द गुन्हा सिध्द होत असल्याकारणाने आरोपी रंजीत किसन पारवे यास कलम 363 भा.दं.वि. नुसार 3 वर्ष कठोर शिक्षा व 1 हजार रूपयाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिण्याची साधी शिक्षा तसेच कलम 366 ए भा.दं.वि. नुसार 5 वर्षाची कठोर शिक्षा व 2 हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिण्याची साधी शिक्षा तसेच पोक्सो कायदयाचे कलम 6 प्रमाणे आरोपीस 10 वर्षाची कठोर शिक्षा व 2 हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिण्याची साधी शिक्षा तसेच आरोपीस कलम 376 (2) (जे) (एन) भा.दं.वि. नुसारसुध्दा शिक्षा ठोठावली परंतु पोक्सो कायदयाचे कलम 6 मध्ये शिक्षा दिल्यामुळे स्वतंत्र शिक्षा या कलमाखाली देण्यात आली नाही. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री बुलडाणा यांनी कामकाज पाहले त्यांना कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. सुरेश किसन मोरे पो.स्टे. अंढेरा यांनी
सहकार्य केले.