दि.१६(प्रतिनिधी)जालना जिल्ह्यातील वालसा येथील ख्यातनाम जेष्ठ मृदंगवादक आत्माराम सीतारामजी रायमल यांना विदर्भातील किनगावराजा येथे श्रीकामक्षादेवी संस्थानच्यावतीने कलागौरव मृदंगसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.जेष्ठ कीर्तनकार निवृत्तीमहाराज सुरुसे पाचनवडगावकर,गणेशराव राजे,गजानन जगताप,नेताजी राजे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
रायमल यांचे वय सध्या ६५ वर्ष असून गत ५२ वर्षांपासून ते किनगावराजा येथे नवरात्रीच्या उत्सवानिमित्त होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात नियमितपणे हजेरी लावतात. रायमल मूळगाव जालना जिल्ह्यातील मोती गव्हाण असून दुर्गम ग्रामीण भागात राहून आत्माराम रायमल यांनी वारकरी संप्रदायीक मृदंगकला नैसर्गिकरित्या प्राप्त केली.घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतांनाही मृदंगवादनाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी खडतर परिश्रमाने मृदंगवादन कला जोपासली आहे.रायमल यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक ख्यातनाम कीर्तनकारांच्या किर्तनात मृदंगसाथ दिली आहे.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य हभप.रामराव महाराज ढोक यांच्यावर त्यांची विशेष श्रद्धा असून मृदंगसेवक पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल समाधान वाटत असल्याने यापुढेही मृदंगसेवद्वारे संप्रदायिक तथा कलारसिकांची सेवा अखंडपणे करणार असल्याचे मनोगत आत्माराम रायमल यांनी व्यक्त केले आहे.