सिंदखेड राजा/ प्रतिनिधी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (आखाडा) येथे नुकत्याच पार पडलेल्या अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत उत्कर्ष महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले. कुस्ती प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी करत बीए भाग २ चा विद्यार्थी मोहन सरकटे याने 65 किलो वजन गटात सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक व विद्यापीठाचा मानाचा कलर कोट मिळवून महाविद्यालयाचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावले. अंतिम सामन्यात कठीण स्पर्धा असूनही आत्मविश्वास कायम राखत त्याने प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले याशिवाय विश्वजीत कुदळे या विद्यार्थ्यानेही 55 किलो वजन गटात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत ‘छात्र-तरंग’ युवक महोत्सव 2024 नुकताच शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोला येथे पार पडला. या युवक महोत्सवामध्ये सिंदखेडराजा येथील उत्कर्ष कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यामध्ये वकृत्व स्पर्धेत श्रुती सहाने, वादविवाद स्पर्धेत जगदीश जाधव व श्रुती सहाने यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले तर शिवकन्या गंडे या विद्यार्थिनीने रांगोळी स्पर्धेमध्ये आणि अनिता गंडे हिने मेहंदी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
या यशाबद्दल उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सिद्धार्थ खरात सर व सचिव भास्कर गवई सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उत्तम अंभोरे, उपप्राचार्य सुनील सुरुले, प्राध्यापक नरहरी राऊत, प्राध्यापक वीरेंद्र तायडे, प्राध्यापक मल्लिकार्जुन कोथळीकर, प्राध्यापिका श्रद्धा महाजन, प्राध्यापिका स्नेहांकिता पुंडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करत म्हटले ‘विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अभिमानास्पद कामगिरी केली आहे ही कामगिरी संपूर्ण महाविद्यालयासाठी प्रेरणादायी ठरेल, या विजयामुळे उत्कर्ष महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा पुढे चालू राहणार असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशा प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्धार केला आहे.