https://vruttamasternews.com/buldhana-news-20/
सावखेड तेजन शिवारात बिबट्या दिसला
पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये घबराट
सिंदखेडराजा:- तालुक्यातील सावखेड तेजन शिवारात ऐन शेत मशागतीच्या गडबडीच्या दिवसांतच बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सावखेड तेजन गावाच्या दक्षिण दिशेला डोंगरशेत नावाचे शिवार आहे. त्याच भागातून आडगांवराजा जाण्यासाठीचा मार्ग आहे.
सावखेड तेजन ग्रामपंचायत सदस्य असलेल्या शरद सोनुने यांचे शेत त्याच भागात आहे. आज दुपारी दोन वा. सुमारास खरीप पूर्व नियोजन करीत, ते शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना बिबट्या दिसला. वनविभागाच्या संबंधितांशी संपर्क साधून त्यांना ही माहिती कळविली. त्यानंतर वनरक्षक गणेश ठाकरे, वनरक्षक सुभाष बुधवत हे त्या भागात पोहचले. त्यांना शरद सोनुने यांनी बिबट्याच्या पावलांचे ठसे दाखवले. त्याचा पाठलाग करीत बिबट्याचा शोध घेण्यात आला. यासाठी स्थानिक शिवहरी चपटे, मदन जायभाये, बद्री जायभाये, हर्षल सांगळे यांच्या सह गावातील अनेक जण शोध मोहिमेत सामील झाले होते.
मात्र बिबट्याचा ठावठिकाणा लागला नाही.
खरीप हंगामात पूर्व मशागतीच्या व इतर अनेक कामांसाठी शेतकरी सहकुटुंब ज्या काळात सातत्याने शेतात असतो, ऐन त्याच काळात बिबट्या दिसल्याने डोंगरशेत शिवारात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच आडगावराजा, पिंपरखेड, सोनुशी, हनवतखेड, माहेरखेड, वाघोरा आदि परिसरातील गावाकडे तसेच तेथून इतरत्र दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
त्यामुळे वनविभागाने रेस्क्यू टीम पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे