देऊळगाव राजा/ राजू भालेराव महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे माजी सरचिटणीस [1985 -2020] अखिल भारतीय पेंशन असोसिएशन चे केंद्रीय अध्यक्ष [2020 ते अद्यावत] अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे माजी उपाध्यक्ष [2011 ते 2018] पंचायत वर्तमान मासिकाचे संपादक आदरणीय कॉ. अशोक थुल साहेब यांचे आज नागपूर येथे त्यांचे निवासस्थानी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले*.
*एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले श्रीयुत अशोक थुल साहेब यांनी शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे तत्त्व आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेवर संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचे व्यासंगी गाढे अभ्यासक विचारवंत आणि संविधानपूजक व शाश्वत चिकित्सक कृतीशील कर्मठ व्यक्तिमत्व होते. त्याकाळी बी.कॉम एल. एल. बी. कायद्याचे पदवीधर असतानाही कर्मचाऱ्यांच्या चळवळीत दाखल झाले. आदरणीय कॉम्रेड र. ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाला महाराष्ट्रात आणि देश पातळीवर ओळख निर्माण करून दिली. पायाला भिंगरी बांधुन घरावर तुळशीपत्र ठेवून प्रवासाच्या अपुऱ्या सोयी असतांनाही संपूर्ण तालुका, जिल्हा महाराष्ट्र पायाखाली घातला. मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केवळ संघटीत होऊन संघर्ष करणे हाच एकमेव मार्ग आहे हा त्यांच्या विचारांचा पाया होता. अनेक प्रवर्ग संघटना त्यांनी बांधल्या. संघटना मजबूत तर महासंघ मजबूत आणि महासंघ मजबूत तरच संघटना मजबूत, मोर्चे, धरणे, संप हाच लाभ पदरात पाडून घेण्याचा गाभा असल्याचे विचार त्यांनी सतत कर्मचाऱ्यांच्या मनावर बिंबवले. त्यांचे मराठी आणि इंग्रजी वर प्रभुत्व होते. आपल्या अभ्यासावर ते मंत्रालय असो की वरीष्ठ अधिकारी असो सर्वांना नमवन्याची ताकद त्यांच्यात होती त्यांच्यासोबत माझा सत्संग 30 वर्षाचा होता ते माझे उत्तम मार्गदर्शक होते*.
*उत्कृष्ट नेतृत्व, कर्तृत्व, आणि वक्तृत्व असा त्रिवेणी संगम म्हणजे साहेब. शिस्तबद्ध, वक्तशीर, निर्णयाप्रती कठोर होते परन्तु भावनिक सुद्धा तितकेच होते. त्यांच्या निधनाने पेन्शनर असोसिएशनचे आणि कर्मचारी चळवळीचे छत्र हरपले आहे याचे दुःख तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील कामगार कर्मचारी नेत्यांनाही आहे*.
*अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ तथा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…
कॉ. अशोक थुल साहेब यांना साश्रूनयनांनी अखेरचा लाल सलाम
उमेशचंद्र चिलबुल
*राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ*
राष्ट्रीय उपाध्यक्ष
*अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ*