सिंदखेडराजा /प्रतिनिधी दिल्लीतील प्रतिष्ठित भृगुपीठाधीश्वर श्री सुषील गोस्वामी महाराज (राष्ट्रीय संयोजक सर्वधर्म परिषद दिल्ली ) यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विदर्भरत्न डॉ. अमजदखान पठाण यांची महाराष्ट्र राज्य संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी सिंदखेडराजा येथे आयोजित ४५ व्या राष्ट्रीय एकात्मता व साम्प्रदायिक सौहार्द परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. या विशेष प्रसंगी डॉ. पठाण यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना स्मृतिचिन्ह व नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
*श्री सुषील गोस्वामी महाराजांचे विशेष शब्द:*
श्री सुषील गोस्वामी महाराज यांनी आपल्या भाषणात डॉ. पठाण यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांना भारताचा रत्न म्हणून संबोधले. ते म्हणाले की, “डॉ. पठाण नक्कीच साम्प्रदायिक ऐक्यासाठी नवा आदर्श निर्माण करतील. त्यांच्या दिवंगत वडिलांना शांततेचे मसीहा म्हणून ओळखले जात असे, आणि डॉ. पठाण सार्वभौम बंधुतेसाठी शांततेचे प्रतीक बनतील असे उद्गार पीठाधीश्वर स्वामी यांनी केले . विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी आणि धर्म गुरूंशी असलेल्या त्यांच्या दृढ संबंधांमुळे त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी ठरेल.”
*डॉ. पठाण यांची परंपरा आणि योगदान:*
डॉ. अमजदखान पठाण हे सर्व धर्म समभाव चे प्रणेते भारत गौरव अलहाज असदबाबा यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेसाठी आणि साम्प्रदायिक ऐक्यासाठी अर्पण केले. वडिलांच्या प्रेरणेतून डॉ. पठाण यांनी 2004 पासून, वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौम बंधुता यासाठी कार्य सुरू केले. त्यांनी सर्व धर्मीय समुदायांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला असून, ते शांतता व ऐक्याचे प्रतीक मानले जातात.
डॉ. पठाण विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संलग्न असून, त्यांचे विविध देशांतील राजनैतिक अधिकारी, उच्चस्तरीय अधिकारी आणि धर्मगुरुंसोबत स्नेहसंबंध आहेत. ते तीन देशांसाठी जागतिक शांतिदूत म्हणून ओळखले जातात आणि त्यांना 150 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच, जगद्गुरु शंकराचार्य आणि स्वामी नारायण मंदिराचे महंत स्वामी यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांना प्रशस्तिपत्र प्रदान केले आहे.महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री भगत सिंग कोषारी यांनी डॉ पठाण यांना मुंबई रत्न पुरस्कार देऊन त्याच्या कार्याचा गौरव केला होता. डॉ पठाण यांचे समाजकार्य आणि गरजू रुग्नासाठी असलेली धडपड हि या नवीन पिढीसाठी प्रेरणामय आहे.
*कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:*
या कार्यक्रमात स्वामी देवेंद्र ब्रह्मचारी (जैन साधक), मुफ्ती मंजूर जियाई (चीफ मुफ्ती, महाराष्ट्र), स्वामी महाव्रतजी (स्वामीनारायण मंदिर), आमदार नारायण कुचे (बदनापूर विधानसभा ) , ॲड. नाझेर काझी (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बुलढाणा), विनोद वाघ (भाजप प्रवक्ते),अभिनेता नितीन देसाई, इंडोनेशिया व कोरियाचे महावाणिज्यदूत, डॉ. सुकेशकुमार झंवर (सीएमडी, बुलढाणा अर्बन), सुनील अगावने (आयआरएस,सहआयुक्त आयकर विभाग भारत सरकार),
डॉ. विठ्ठलराव दांडगे (माजी अधिष्ठाता, वैद्यकीय महावियलंय नागपूर ), सुरेश कोटे (अध्यक्ष, लिज्जत पापड), , महेबूब कासार (उपआयुक्त जीएसटी,महाराष्ट्र राज्य ) सज्जादा नशिण अयाझखान, सज्जादा नशिण ऍड अरेफखान, उर्स अध्यक्ष अशपाकखान यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पठाण यांचा नवा अध्याय:
सर्वधर्म परिषदेने डॉ. पठाण यांची महाराष्ट्र राज्य संयोजक म्हणून नियुक्ती करून त्यांच्या कार्याला अधिक दृढ मान्यता दिली आहे. डॉ. अमजदखान पठाण हे शांततेसाठी नवा अध्याय उघडतील आणि साम्प्रदायिक सौहार्दाचे प्रतीक बनतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
डॉ. पठाण यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांचे देश विदेशातून अभिनंदन होत आहे