https://vruttamasternews.com/buldhana-news-21/जागतिक तापमान वाढ रोखणे प्रत्येकाची जबाबदारी..
वनश्री जनाबापू मेहेत्रे..
शेंदुर्जन येथे वृक्षारोपण व संगोपन सभेत वनश्री मेहेत्रे यांचे प्रतिपादन…
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेंदिवस तापमान वाढत आहे.वाढत्या तापमानाने 53 डिग्री सेल्सिअस चा टप्पा पार केल्याने परिस्थिती अधिक बिकट होत आहे.जागतिक तापमान वाढ जर अशीच होत राहिली ती जर वेळीच रोखली नाही तर भूतलावरील मानव प्राण्यासह सर्व सजीव सृष्टी नष्ट होईल.सजीव सृष्टीच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असून जागतिक तापमान वाढ रोखणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिन,शिवराज्याभिषेक दिन व मृग नक्षत्र प्रारंभ या त्रिवेणी संगमावर सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत शेंदुर्जन मध्ये वृक्षारोपण व संगोपन सभेचे आयोजन ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले होते.
सभेला उदबोधित करताना वनश्री मेहेत्रे यांनी वाढते तापमान,वृक्षारोपण, वृक्ष संगोपन,बिजारोपण, जलसंधारण,गोसंवर्धन, जंगल संवर्धन,पशुपक्षी प्राणी संवर्धन,विषमुक्त शेती,वनशेती,एक व्यक्ती एक झाड,विविध पर्यावरणीय समस्या इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन करत प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारणाचे आवाहन केले.तर वनरक्षक कुमारी सोनाली वाळके यांनी पर्यावरण संवर्धनात सामाजिक वनीकरणाची भूमिका स्पष्ट करत उपस्थितांना वृक्षारोपणाचे आवाहन केले.कृषी सहाय्यक श्री.प्रणव वाघ यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड व पर्यावरण संवर्धन बाबत मौलिक माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविकात कार्यक्रमाचे संकल्पक ग्रामविकास अधिकारी श्री प्रकाश आढाव यांनी शेंदुर्जन ग्रामपंचायत या पावसाळ्यात एक हजार वृक्षरोपटे लावून त्याचे उचित संगोपन करणार असल्यास सांगितले. शेंदुर्जन येथील पर्यावरण प्रेमी श्री.संदीप शिंगणे यांनी शंभर वृक्षांचे पालकत्व स्वीकारल्याबद्दल सभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठोबा खरात होते.कार्यक्रमास सरपंच पती,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा गावातील पर्यावरण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
कार्यक्रमाची सांगता श्री मेहेत्रे यांनी दिलेल्या पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञेने झाली..