बुलढाणा/ प्रतिनिधी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार २०२३ नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये डॉ. सुनील श्रीराम पवार यांच्या ‘सिझर न झालेल्या कविता’ या संग्रहाला शब्दगंध पुरस्कार जाहिर करण्यात येत असल्याची माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी व कार्यवाह भारत गाडेकर यांनी दिली.
यापूर्वी डॉ पवार यांच्या कविता संग्रहाला अनेक राज्यस्तरिय पुरस्काराने गौरविण्यात आले असून अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ.सुनील पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिकांना शब्दगंध पुरस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये मायावी (सुनील जाधव,पालघर), अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन (बाळू दुगडूमवार,नायगाव), यशाची सूत्रे (रोहिदास पोटे,मुंबई), फुलपाखरू (तुकाराम खिल्लारे,परभणी), भावांजली (प्रा.मीरा निचळे,अमरावती),
एक होती आशा (प्रकाश खंडागळे,जामखेड), मुक्ता मुक्त झाली (साहेबराव तुपे,लोणी), ते दिवस आठवून बघ (डॉ.अशोक शिंदे,कोल्हापूर) यांच्या साहित्यकृतीला शब्दगंध पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालय,अहिल्यानगर येथे कवयित्री संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.