बुलढाणा/प्रतिनिधी कौशल्य प्राप्त करून त्यावर आधारित नोकरी करणारा वर्ग हा पत्रकार नसून ज्याला समाजात बदल करायचा आहे, ज्याच्यामध्ये क्रांतीची उर्मी आहे, असा समाजातील वाईट घटना घडामोडींवर भाष्य करणारा वर्ग म्हणजे पत्रकार होय. मंत्रालयात सहसचिव तसेच वीस वर्ष विविध मंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून कार्य केले. आता आमदार म्हणून जबाबदारी पार पाडत असतानाही बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला माझे नेहमीच सहकार्य राहिले, असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ‘पत्रयोगी जीवन गौरव पुरस्कार सोहळा’ रविवार 16 फेब्रुवारी रोजी गर्दे सभागृह बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध न्यूज अँकर प्रसन्न जोशी, सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित राजपूत, उपाध्यक्ष मराठी पत्रकार परिषद चंद्रकांत बर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, भारताच्या स्वंतत्र लढ्यात पत्रकारांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही टिकवण्यासाठी जीवाचे रान केले. परंतु आता माध्यमांवर संशय घेतला जात आहे, निवडणुकांच्या काळात हे प्रमाण तर खूप वाढले असल्याची खंत आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केली.
विधानसभेत आवाज उठवणार
पत्रकारांना बाजूला करून कुठलाही शासनाचा कार्यक्रम यशस्वी करता येत नाही मात्र तरीदेखील शासन स्तरावरून पत्रकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच महाराष्ट्र व देशाचे राजकारण कुठल्या वळणावर चालले आहे, हेच कळत नाही. आगामी काळात विविध प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवणार असल्याचा निर्धारही आमदार सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला.