बिबी /भागवत आटोळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची कामे जलद गतीने पार पाडण्यासाठी नवीन १२ मंडळ अधिकारी व १८ तलाठी कार्यालयाच्या इमारतींसाठी ४ कोटी ९४ लक्ष रुपयाचा निधी आमदार मनोज कायंदे यांनी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आ. कायंदे यांच्या धडाकेबाज कामाबद्दल मतदारसंघातून व विशेष करून महसूल प्रशासनातून त्यांचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांची अतिशय महत्त्वाची कामे तलाठी कार्यालयाकडे असतात. त्यामध्ये सातबारा, फेरफार नोंदी, उत्पन्नाचे दाखले शालेय कामासाठी, श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजना, ही कामे या कार्यालयामध्ये पार पडत असतात. जर गावामध्येच तलाठी कार्यालय असेल तर सर्वसामान्य माणसाचे कामे हे जलदगतीने व वेळेवर होईल. तसेच गावामध्येच मंडळ अधिकारी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतरस्ते, पाणंद रस्ते खुले करून देण्यास मदत होईल, फेरफार मंजूर ही कामे गावामध्ये झाल्यामुळे प्रशासन व जनता यांची नाळ जुळेल. याचा फायदा सर्व सामान्य जनतेला होतो. त्यादृष्टीने मतदारसंघातील सर्वसामान्यांची कामे ही गावामध्येच वेळेत व गतीने व्हावी, यासाठी येत्या काळात इतरही ज्या ज्या विभागांना कार्यालय उपलब्ध नाहीत त्यांनासुद्धा कार्यालय करून देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन यानिमित्त आ. मनोज कायंदे यांनी केले आहे.
———————————–
मंडल अधिकारी व तलाठी कार्यालये गावातच झाली तर त्याचा शेतकरी, ग्रामस्थांना फायदा होतो. पुढील काळातही ज्या विभागांना कार्यालये नाहीत, त्यांनासुद्धा कार्यालये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
मनोज कायंदे, आमदार, सिंदखेडराजा