चिखली ( प्रताप मोरे ) : – राज्यातील फडणवीस सरकारने शेतकर्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते की शेतकर्यांचे कर्ज माफ करू असा फ़ंडा वापरून सरकारने शेतकऱ्यांची मते घेतली होती. परंतु, सरकारने हे आश्वासन पाळले नाही व शेतकर्यांची फसवणूक केली.त्यामुळे आज कर्जबाजारी झालेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा फसवेगिरी सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत पंचक्रोशीतील शेतकर्यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात धाव घेवुन पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले, तब्बल अडिच तास हे आंदाेलन चालले. शेवटी पोलिसांनी शेतकर्यांचे निवेदन स्वीकारून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे पाठवू, असे सांगितल्यानंतर शेतकर्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.हा प्रकार 4 एप्रिल रोजी घडला .
शेकडो शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले की विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकर्यांनी कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. तसा जाहीरनामादेखील या सरकारने प्रसिद्ध केलेला आहे. परंतु, सत्तेवर आल्यानंतर सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली. शेतकर्यांना कर्जमाफी दिली नाही, त्यामुळे आर्थिक संकटातील कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि याला हेच सरकार जबाबदार आहे. त्यामुळे या सरकारविरोधात फसवणूक व शेतकर्यांना आत्महत्येच प्रवृत्त करण्याचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी देऊळगाव घुबे, भरोसा, रामनगर, मेरा, अंचरवाडी आदी गावांतील शेतकरी अंढेरा पोलिस ठाण्यात धडकले .आणि या सरकार विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे असे म्हटले परंतु पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी अंढेरा पोलिस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू करुण सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध सुरु केला. हा प्रकार पाहुण अखेर पोलिसांनी वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर शेतकर्यांचे निवेदन स्वीकारले. व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य सरकारकडे पाठवून देऊ, असे सांगितले. सरकारविरोधात गुन्हे दाखल करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर शेतकर्यांनी आपले ठिय़्या आंदोलन मागे घेतले.