दुसरबिड /दीपक म्हस्के डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
प्राचार्य छगनराव भुजबळ कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरा आश्रम.
ता.मेहकर जि.बुलडाणा
भीमसूर्य फाउंडेशन व बोधीसत्व शिक्षण क्रिडा व बहुउद्देशीय संस्था दुसरबीड.
मो. 9764959208
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक युगातील क्रांतीकारी विचारवंत होत. त्यांच्या विचाराने आज संपूर्ण जगाला भुरळ घातली आहे. संपूर्ण जगात असा एकही देश वा माणूस शोधून सापडणार नाही की, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे मानव मुक्तीचे विचार माहीत नसतील. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे नुसते नाव नसून संपूर्ण दलित पिडीत शोषित वंचीतांचे प्रेरणास्रोत आहे . हजारो वर्षापासून भारतीय समाज व्यवस्थेत अस्पृश्य म्हणून पिचल्या गेलेला समाजाला एका मानवी समूहानेच गुलाम केलेले होते. निसर्गनिर्मित पाणी,हवा, जमीन वापरण्यावरही त्यांना बंदी होती.या सर्व अमानुषतेवर प्रहार करण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. एकीकडे भारत इंग्रजांच्या गुलामीत आहे अशी आगपाखड करणाऱ्या उच्चवर्णीय समाजाने भारतातच एका मानवी समूहाला गुलाम करून अमानुष वागणुक देत होते यावर मात्र ते काहीच बोलत नसत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शिक्षणाच्या व विद्वत्तेच्या जोरावर इंग्रजांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले व आपले दुःख मुखर केले. अशा या महामानवाचा जन्म १४ एप्रिल १९९१ रोजी मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. बालपणीच वडील सुबेदार रामजी सपकाळ यांनी शिक्षणाचे बाळकडू पाजले. शिक्षणाची आवड निर्माण करुन वाचनाला प्रोत्साहन दिले म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर घडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारच नाहीत तर ते उत्कृष्ट विद्यार्थी, अर्थतज्ञ, प्रशासक, कायदे तज्ञ, समाजशास्त्रज्ञ, मानववंश शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, राजकीय मुत्सद्दीपणा ,भाषावार प्रांतरचनेचे शिल्पकार, शेतकऱ्याचे उद्धारकर्ते, स्त्रियांचे मुक्ती दाते, कामगारांचे कैवारी, ग्रंथोपासक, बौद्ध धर्म चक्र प्रवर्तक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. ‘लाथ मारेल तिथे पाणी काढील’ या उक्तीप्रमाणे ते ज्या क्षेत्रात गेले तेथे अव्वलच राहिले. त्यामुळे त्यांचा सन्मान फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात केल्या जातो. अशा या महामानवाचे शिक्षणविषयक विचार व त्यांचे शिक्षणविषयक कार्य समजून घेणार आहोत.
१८९४ ला सुभेदार रामजी सपकाळ इंग्रजी सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या मूळ गावी आले. तेथील प्राथमिक शाळेत भीमराव ला प्रवेश न मिळाल्यामुळे रामजीनीं भीमरावांना घरीच अक्षर ओळख करून दिली. त्यानंतर त्यांनी १८९६ ला सातारा येथील कॅम्प स्कूल या मराठी शाळेत त्यांचे नाव दाखल केले.१९०४ साली त्यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल आताचे प्रतापसिंग हायस्कूल मधून चौथी पास केले. मुंबईतील एलफिस्टन हायस्कूलमधून १९०७ साली मॅट्रिकची परीक्षा यशस्वीपणे पास झाले. १९१३ मध्ये मुंबई विद्यापीठाची अर्थशास्त्र व राज्यशास्त्र मुख्य विषय घेऊन बीए डिग्री मिळवली. या शिक्षणासाठी त्यांना बडोदा संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्याकडून शिष्यवृत्ती मिळाली. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. तेथे राज्यशास्त्र व अर्थशास्त्राचे उच्चशिक्षण घेतले. परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पीएचडी मिळविणारे ते पहिले भारतीय तसेच दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट डी. एस. सी. व पीएचडी पदवी मिळवणारे ते पहिले व्यक्ती होते. नोव्हेंबर १८९६ ते नोव्हेंबर १९२३या 27 वर्षात मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ग्रेज टू लंडन, बॉन विद्यापीठ जर्मनी येथे उच्च शिक्षणासाठी सारखे फिरत होते. विद्यार्थी दशेत असताना 18 तास अभ्यास करून त्यांनी दैदीप्यमान यश संपादन करणारे भारतातील सर्वात प्रतिभा शाली व सर्वाधिक उच्चविद्याविभूषित व्यक्ती ठरले. १९५०च्या काळात त्यांना एल.एल.बी. आणि डिलीट या दोन पदव्याने सन्मानित केले. जगातील सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्तींमध्ये त्यांचे स्थान अव्वल आहे. त्यांनी स्वतः शिक्षण घेऊन माझ्या गोरगरीब समाजही शिक्षित झाला पाहिजे, त्यासाठी १४जून १९२८ रोजी दलित शिक्षण संस्थेची स्थापना केली. यामधून दलितांच्या मुलांची प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व्हावे हे त्यांचे ध्येय होते. परंतु आर्थिक दृष्ट्या ही जबाबदारी पेलणे अशक्य झाल्याने मुंबई सरकारने या संस्थेस आर्थिक मदत करावी ;असे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे मुंबई गव्हर्नर ने ०८ ऑक्टोब १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाच वस्तीगृह मंजूर करून वस्तूगृहांच्या खर्चासाठी महिना नऊ हजार रुपये अनुदान मंजूर केले.
फक्त नोकरीसाठी उपयोगाचे नाही, तर समाजामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी उपयोगाचा आहे. म्हणून शिक्षण घेतलेला माणूस माणसाच्या गुलामगिरीला लाथ मारतो. शिक्षणामुळे माणसांमध्ये सद्सदविवेक बुद्धी जागृत होते. “ शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यामुळेच म्हणतात.
अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रगल्भ शैक्षणिक दृष्टी दिसते. त्यांनी आपल्या आयुष्यात विद्या, विनय, शील हे तीन दैवत मानली होती. विद्या शिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकी नाही. माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे तशीच विद्येची आहे. भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी इंग्रजांनी सुरू केलेल्या उच्च शिक्षणाचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षणात समाजातील गुलामी नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “उपासमारीने पोषण कमी झाल्यास माणूस अल्पायुषी बनतो, परंतु शिक्षणाच्या अभावाने जिवंतपणे मृता वस्तीत असल्यासारखे आहे.” विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीला चालना देऊन बौद्धिक शक्तीच्या संवर्धन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली विवेक शक्ती प्रज्वलीत केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनात खंड पडून देता शिकले पाहिजेत. शिक्षण हे एक अगाध समुद्र आहे. शिक्षण घेत घेत माणूस कितीही समोर गेला तरी मरेपर्यंत तो गुडघाभर पाण्यातही जाऊ शकत नाही.” म्हणून शिक्षण घेणाऱ्यांनी गर्व करू नये.असा सल्ला ते उच्चशिक्षित वर्गाला देतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या समाजातील जवळपास ३३ विद्यार्थी स्वखर्चाने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविले. तसेच त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना विविध शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून दिल्या. उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी तरुणांना प्रोत्साहन दिले.
भारतीय संविधान समीतीत मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. संविधान लेखनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. तेव्हा देशातील दलित,पिडीत, गोरगरीबांना शिक्षण मिळाले पाहिजे. समाज शिक्षित झाला पाहिजे या प्रेरणेने त्यांनी शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधानाच्या कलम २१-अ मध्ये मूलभूत अधिकार म्हणून नमूद आहे. ८६ व्या घटनादुरुस्ती कायद्याने (2002) हे कलम भारतीय संविधानात समाविष्ट केले. या कलमाद्वारे ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर खूप प्रेम होते. पुस्तकासाठी घर बांधणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरतात. जवळपास 22 हजारापेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह त्यांच्याजवळ होता. पुस्तकाविषयी ते म्हणतात, “तुमच्याकडे दोन रुपये असतील, तर एक रुपयाची भाकरी घ्या;आणि एक रुपयाचे पुस्तक, कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल, तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल”. अन्न, वस्त्र, निवाराप्रमाणे पुस्तक ही मूलभूत गरज आहे, असे ते म्हणत. एकदा परदेशातून येताना पुस्तके एका बोटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका बोटीत. परंतु समुद्रातील वादळामुळे पुस्तकाची बोट बुडाली. ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली तेव्हा दोन दिवस त्या पुस्तकाच्या विरहात ते सारखे रडत होते. एवढे मोठे पुस्तक प्रेम इतिहासात शोधून सापडत नाही. डॉ .बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “जर माझ्या घरावर जप्ती आली आणि माझ्या सर्व चीज वस्तू नेल्या, तर मी शांत बसेल. पण माझ्या पुस्तकाला कुणी हात लावला, तर मी ते कदापि सहन करणार नाही.” एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना पुस्तकाविषयी प्रेम होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणातून क्रांती होते हे माहीत होते. त्यासाठी त्यांनी विविध ग्रंथाचे लिखाण केले. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती, रुपयाची समस्या उगमने निरसन, जातीव्यवस्थेचे निर्मूलन, संघराज्यविरुद्ध स्वातंत्र, पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, रानडे गांधी आणि जिना, श्री गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्य साठी काय केले, जातीचा पेच आणि तो सोडविण्या चा मार्ग, शूद्र पूर्वी कोण होते, राज्य आणि अल्पसंख्यांक, महाराष्ट्र एक भाषिक प्रांत, अस्पृश्य ते कोण होते होते अस्पृश्य का बनले, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, हिंदू धर्मातील कोडे, पाली भाषेचा शब्दकोश, पाली व्याकरण, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती, बुद्ध आणि कार्ल मार्क्स,संविधान आणि माझे आत्मचरित्र इत्यादी ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांचे दहा पुस्तके अपूर्ण स्वरूपात राहिलेले आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध, परीक्षणे, निवेदने हे विखुरलेल्या स्वरूपात त्यांचे प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामीप्रतिभाशाली होते. ते मराठी, संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारशी भाषा जाणणारे विद्वान होते. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत बावीस खंड प्रकाशित केले आहेत.
अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक क्रांतिकारक होते. शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व आत्मिकेचा विषय होता. समाज परिवर्तनासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षणामध्ये माणसातील गुलामी, लाचारी, दारिद्र्यद्या, ज्ञान, अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, परंपरा नष्ट करण्याची शक्ती आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला दुधारी शस्त्र मानले आहे. त्याचा माणसाने योग्य वापर केला, तर नक्कीच माणूस श्रेष्ठत्वाकडे जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान अधोरेखित करण्यासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या नावाने अनेक विद्यापीठांची निर्मिती झाली. प्रत्येक विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन केंद्र उभी राहिली अशा या महामानवाची आज जयंती त्या निमित्ताने ही विचारांची आदरांजली व सर्वाना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…