Buldhana news शाळा, शिक्षणाची वाताहत दूर न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव घालू भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा सीईओंना इशारा

https://vruttamasternews.com/buldhana-news-42/

शाळा, शिक्षणाची वाताहत दूर न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव घालू

भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचा सीईओंना इशारा

बुलढाणा/ प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक शाळांच्या इमारतींची दुर्दशा झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. त्यातच शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. शाळा आणि शिक्षणाची ही वाताहत दूर करण्यासाठी पंधरा दिवसांत रिक्त पदे तत्काळ भरून विद्यार्थ्यांना पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या; अन्यथा जिल्हा परिषद इमारतीला घेराव घालण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.

या प्रश्नांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची सतीश पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. रितसर निवेदन सादर करून चर्चा केली. राज्य आणि केंद्र सरकार राबवत असलेले शैक्षणिक धोरण हे बहुजनांच्या हिताचे नाही. किमान प्राथमिक शिक्षण हे सर्वांना समान असणे गरजेचे आहे. खासगी व सरकारी शाळेचे अभ्यासक्रम वेगवेगळे असून विविध प्रकाशकांकडून प्रकाशित केलेले आहेत. यामुळे कळत नकळत विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत भेदभाव अभ्यासक्रमाद्वारे केल्या जात आहे. सर्वांना समान शिक्षण नसल्याने पुढे समान संधीचा उपयोग पाहिजे तसा घेता येत नाही. यामुळे बहुतांश पालकांचा कल हा खासगी इंग्रजी शाळेमध्ये दाखल करण्याकडे आहे. ‘त्या’ शाळांची फी सर्वसामान्य पालक वर्गाला परवडण्यासारखी नाही. आर्थिकदृष्ट्या गरीब वर्ग नाइलाजाने जिल्हा परिषद शाळेमध्ये पाल्यांना शिक्षण देतो. मात्र, त्याच जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मुलांना योग्य शिक्षण योग्य कालावधीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये दिल्या जात नाही. यामुळे मुलांच्या अभ्यासक्रमावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. रिक्त जागा असतानाच ऐच्छिक शिक्षकांच्या बदल्यादेखील करणे बाकी आहे. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारानुसार वय वर्ष सहा ते चौदापर्यंत प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळायला हवे. परंतु अनेक शाळेवर शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याकारणाने मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. एवढेच नाही तर अनेक शाळांमध्ये सुस्थितीत वर्ग खोल्या नाहीत. एकाच खोलीमध्ये अनेक वर्ग भरवले जातात. काही ठिकाणी एकच शिक्षक अनेक वर्गांना शिकवतात. काही ठिकाणी वर्ग खोल्यांचे छत गळते. काही शाळांच्या ग्राउंडमध्ये तुडुंब पाणी भरल्या जाते, त्याचा निचरा केल्या जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितालासुद्धा धोका होऊ शकतो.

पंधरा दिवसांच्या काळात तातडीने समस्या दूर न केल्यास जिल्हा परिषदेला घेराव घालू, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

 

पाणी नाही, स्वच्छतागृहाची समस्या कायम

पिण्याचे शुद्ध पाणी नाही, मुला-मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीत, संरक्षक भिंत नाहीत. जे आहेत, ते पडक्या अवस्थेमध्ये आहेत. काही शाळांच्या वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असून दरवाजे व खिडक्यासुद्धा मोडकळीस आलेल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी पुरेशी मैदाने नाहीत. अशा अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिन विकास होत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

 

पाठ्यपुस्तके, गणवेशाचे काय?

शाळेच्या भिंती चैतन्य निर्माण करणाऱ्या व बोलक्या असायला हव्यात, तेदेखील वातावरण नाही. पाठ्यपुस्तके, पुरेसे शैक्षणिक साहित्य व ड्रेस उपलब्ध नाहीत. सरकार हेतू पुरस्सर ग्रामीण भागातील गरिबांच्या मुलांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? असा सवाल सतीश पवार यांनी यावेळी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *