Buldhana news भीम आर्मीच्या घेराव आंदोलनाची जिल्हा परिषदेने घेतली धास्ती शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह विद्यार्थीहिताला दिले प्राधान्य : सतीश पवार यांना दिले लेखी पत्र : आंदोलनापूर्वीच मागण्यांची दखल

https://vruttamasternews.com/buldhana-news-50/

भीम आर्मीच्या घेराव आंदोलनाची जिल्हा परिषदेने घेतली धास्ती
शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह विद्यार्थीहिताला दिले प्राधान्य : सतीश पवार यांना दिले लेखी पत्र : आंदोलनापूर्वीच मागण्यांची दखल
बुलढाणा/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील मराठी शाळांची झालेली दुर्दशा आणि शिक्षकांच्या रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झालेली वाताहत पाहता भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हा परिषदेला घेराव घालण्याचा इशारा सीईओंना दिला. या आंदोलनाची धास्ती घेत प्रशासन कामाला लागले. शिक्षण विभागाशी संबंधित मागण्या असल्याने प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सुस्थितीतील स्वच्छतागृह, चांगल्या शाळाखोल्या, पडक्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध केल्याचे लेखी पत्र सतीश पवार यांना दिले आहे. आमच्या वतीने सर्व भौतिक सुविधा व अन्य प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने घेराव आंदोलन मागे घेण्याची विनंती शिक्षणाधिकाऱ्यांनी केली आहे.
आंदोलनापूर्वीच मागण्यांची दखल घेतल्याने भीम आर्मीच्या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया सतीश पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.
शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मराठी माध्यमाकरिता १७७ व उर्दूसाठी १०२ अशा २७९ पदांची मागणी पवित्र प्रणालीद्वारे शासनाकडे करण्यात आली होती. यापैकी मराठीचे १६९ व उर्दू माध्यमाचे ३१ असे २०० शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच रिक्त असलेली ७९ पदे मागणीप्रमाणे पवित्र प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव व शासनस्तरावरील बाबींसंदर्भात भीम आर्मीचे निवेदन पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी आपले पत्रात नमूद केले.
शाळांना आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. उपलब्ध निधीच्या अधिन राहून २०२३-२४ मध्ये ८४ वर्गखोल्या, ५६ शाळांना संरक्षण भिंत, ४४ शाळांना स्वच्छतागृह व १३७ शाळांना इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०२४-२५ या वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून शालेय फर्निचर, गणित भाषा विज्ञान पेटी, एपीजे अब्दुल कलाम नोवेटीव्ह सायन्स सेंटर, आसीटी लॅब व खेळाचे साहित्य देण्यात आले असून, उर्वरित शाळांनाही साहित्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शाळांमधून या साहित्याचा अध्यापनात प्रभावी वापर करणबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी वितरित करण्यात आले असून, विद्यार्थी संख्येचा आढावा घेऊन कमी अधिक असलेल्या ठिकाणी समायोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना बुट व मोजांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. प्रतिविद्यार्थी दोन गणेवश दिले जातील, असे शिक्षणाधिकारी बी.अर. खरात यांनी लेखी दिले आहे.

खासगी शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा

काही राज्य मंडळ व सीबीएसई संलग्न इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या मंडळाने प्राधिकृत केलेल्या पुस्तकांऐवजी अन्य खासगी प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर केल्या जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. इंग्रजी माध्यमाच्या आपल्या शाळेत बोर्डाने प्राधिकृत केलेल्या मान्यताप्राप्त पुस्तकांचाच वापर करावा. इतर खासगी प्रकाशनांच्या पुस्तकांचा वापर करू नये. तसे झाल्यास शाळेविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्रान्वये दिला आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांचे शिक्षण आयुक्तांना विनंतीपत्र

भीम आर्मीचे सतीश पवार यांच्या इशाऱ्याचा संदर्भ देत शिक्षणाधिकारी खरात यांनी शिक्षण आयुक्तांना शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबतचे विनंतीपत्र २२ जुलै रोजी दिले. मराठी व उर्दू माध्यमांची २७९ पदांची मागणी पवित्र प्रणालीद्वारे नोंदविण्यात आली होती. यापैकी मराठी माध्यमाचे १६९ व उर्दू माध्यमाचे ३१ असे २०० शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले. आता रिक्त ७९ पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

शाळांना भेटी देऊन खात्री करणार
जि.प. प्रशासनाने आश्वासन दिले असलेतरी भीम आर्मी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शाळांना भेटी देऊन पूर्ततेची खात्री करणार आहे. दिलेल्या शब्दाला न जागल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे सतीश पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *