सेवागौरव: सोहळा कर्तव्यनिष्ठेचा..” ठरला वैचारिक तेवढाच भावनिक ! व्यथीत होण्यापेक्षा अस्वस्थ होत व्यवस्था परिवर्तनासाठी पुढं यावं- खरात

https://vruttamasternews.com/buldhana-news-58/

“सेवागौरव: सोहळा कर्तव्यनिष्ठेचा..” ठरला वैचारिक तेवढाच भावनिक !

व्यथीत होण्यापेक्षा अस्वस्थ होत व्यवस्था परिवर्तनासाठी पुढं यावं- खरात

 

बुलढाणा:

महाराष्ट्रासह देशात शेतकऱ्यांच्या वेदनांवर वेगवेगळ्या पॅकेजच्या माध्यमातून फक्त फुंकर घातल्या जाते, धोरणात्मक निर्णय घेतल्या जात नाही. त्यामुळे शेतकरी कोलमडला अन् आत्महत्यांचे सत्र वाढले. शेतकरी प्रश्नांवर शासन व प्रशासन कुचकामी ठरले आहे.गत दहा वर्षात लोकशाहीच्या सर्व व्यवस्था मजबूत होण्याऐवजी भुसभुशीत होत असल्याचे परखड भाष्य मंत्रालयात आवर सचिव पदावर काम करून स्वेच्छा सेवानिवृत्ती पत्करलेले सिद्धार्थ खरात यांनी करून, चालू असलेल्या प्रकारांवर व्यथीत होण्यापेक्षा अस्वस्थ होऊन उभारी घेत काम केलेतर आपल्या भागाच्या विकासासाठी आपणच काहीतरी करू शकतो.. असे सांगून व्यवस्था परिवर्तनासाठी राजकीय माध्यमातून पुढे येण्याचे आवाहन केले. त्यासाठी आता आपण पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

 

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील आडवळणी असलेले ग्राम ताडशिवनीचे भूमिपुत्र सिद्धार्थ रामभाऊ खरात यांचा सेवागौरव सोहळा शनिवार २७ जुलै रोजी बुलढाणा येथे गोवर्धन सभागृहात भावनिक तेवढ्याच वैचारिक वातावरणात दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. यावेळी ते सत्काराला उत्तर देत होते.

 

सहसचिव गृहविभाग मंत्रालय मुंबई येथे ३० वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून १ जुलै २०२४ रोजी सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. या निमित्त बुलढाणा येथील त्यांच्या मित्र मंडळींनी “सेवागौरव: सोहळा कर्तव्यनिष्ठेचा..” या सोहळ्याचे आयोजन बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या अध्यक्षतेखाली तर मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्याहस्ते केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीप्राप्त बारोमासकार प्रा.डॉ. सदानंद देशमुख, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके व दिनेश गीते, गोखले इन्स्टिट्यूट दिल्लीचे डॉ. नरेश बोडखे, डी. टि.शिपणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

माय व मातीच्या आठवणींना उजाळा देताना भावनिक होत सत्काराला उत्तर देतांना सिद्धार्थ खरात यांनी विद्यमान सामाजिक व राजकीय परिस्थितीवर चिंतनगर्भ व तेवढेच सडेतोड भाष्य केले. प्राथमिक शिक्षणापासून ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपर्यंतचा प्रवास तसेच सुवर्णाताईंसोबत झालेल्या आंतरजातीय विवाहाचा किस्साही यावेळी त्यांनी सांगितला. कृषी व्यवस्थेवर परखड मत मांडताना हे चित्र बदलण्यासाठी राजकीय माध्यमातून का होईना आपल्यालाच आता पुढाकार घ्यावा लागेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी करून राजकारणाच्या प्रवेशाची नांदीच दिली.

 

सेवानिवृत्तीनंतर ताकाला जाऊन गाडगे लपविण्यापेक्षा राजकीय मैदानात उडी मारावी, राजकीय पक्षांची गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा करावा व समविचारी 288 उमेदवार उभे करावे, अन्यथा राजकीय पक्षांचे बटिक म्हणून काम करावे लागेल.. असे मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी मत व्यक्त केले. तर पुरातत्व व वन विभाग स्वतःही काही करत नाही अन् इतरांनाही काही करू देत नाही, त्यामुळे ऐतिहासिक व पर्यटन स्थळांच्या विकासाला खिळ बसत असल्याचे राधेश्याम चांडक यांनी सांगून..जिल्ह्यात जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रगतीच्या प्रत्येक धोरणासाठी बुलढाणा अर्बन सदैव कटीबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून सिद्धार्थ खरात यांचा गुणगौरव केला.

 

दिनेश गीते, सुनिल शेळके, डी.टी. शिपणे, डॅा.नरेश बोडखे, प्रा.डॅा. सदानंद देशमुख, लोकसेवा आयोगाच्या सचिव सुवर्णाताई खरात यांनी जिल्ह्यांच्या विकासावर उपाययोजना सूचित करताना सिध्दार्थ खरात यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्र शासन मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास विभाग, आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण व गृह विभागात काम केले. या व्यतिरिक्त गृह, तुरूंग, उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, महसूल, पणन, कामगार, पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्यव्यवसाय, जलसंधारण, रोजगार हमी योजना, उर्जा व बंदरे इत्यादी विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे विशेष कार्य अधिकारी / खाजगी सचिव म्हणून काम केले आहे. मंत्री आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी व खाजगी सचिव सारख्या महत्वाच्या पदावर सर्वाधिक काळ काम करणा-या अपवादात्मक अधिका-यांपैकी ते एक आहेत. त्यामुळेच सिद्धार्थ खरात यांच्या सेवा गौरव सोहळ्याला महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक, विचारवंत, सामाजिक, राजकीय तथा प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती सेवा गौरव सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली. प्रास्ताविकातून रवींद्र साळवे यांनी सोहळ्याच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. बहारदार संचालन पत्रकार राजेंद्र काळे तर आभार ॲड.जयसिंगराजे देशमुख यांनी मानले. मानपत्राचे वाचन सौ. वैशाली तायडे यांनी केले. सोहळ्याच्या संपन्नतेसाठी आयोजक समितीचे राजेंद्र काळे, पुरुषोत्तम बोर्डे, ॲड. जयसिंराजे देशमुख, सुनील सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रविण गीते, सोहम घाडगे, बाबासाहेब जाधव यासह समीतीने अथक परिश्रम घेतले. यावेळी जिल्ह्यांच्या वतीने सन्मानपत्र, महात्मा फुले यांची पगडी देऊन त्यांचा सपत्निक सत्कार केला. जिल्ह्याभरातून आलेल्या उपस्थीतानी, सामाजीक संघटनानी, कर्मचारी संघटनांनी तसेच बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाने खरात जोडप्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *