https://vruttamasternews.com/buldhana-news-72/
लोककवी, वामनदादा कर्डक यांचा जयंतीउत्सव,
“वामनाची गाणीच्या” माध्यमातून अभिवादन..!
सिंदखेडराजा:- लोककवी, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०२ व्या जयंतीच्या पर्वावर तालुक्यातील दुसरबीड येथे प्रबोधनपर गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन उद्या दि. १७ ऑगस्ट, शनिवारी करण्यात आले आहे.
लोककवी, महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती १५ ऑगस्ट रोजी असते. १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्यामुळे बहुतांश लोक त्या दिवशी व्यस्त असतात. मात्र तालुक्यातील समाजाच्या सर्व घटकातील वामनदादा प्रेमींनी एकत्र येत जयंती उत्सव समिती स्थापन केली व दि. १७ ऑगस्ट, शनिवारी सकाळी ११.०० वा. वामनदादांच्या विचारांवर अभिप्रेत असलेल्या गीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिवसभर वामनदादांच्या गीतांची मैफल रंगणार आहे. यामध्ये तालुक्यातील सर्व कवी, गायक, कलावंत यांचा सहभाग असणार आहे. तसेच वामनदादांच्या लेखणीतून उतरलेली गीते, गाणी ज्यांना सादर करायची असतील त्या कलावंतांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे. सहभागी कलावंतांना सन्मानपत्राने गौरविण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शाहीर अमर जाधव यांना ७०३०१२४५७३ व शाहीर गौतम जाधव यांना ९३२२७०९६०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे. कलावंतांना आपली गीते सादर करण्यासाठी कार्यक्रमस्थळी प्रभू डोके यांचा वादक संच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे स्वतंत्रपणे संच सोबत आणण्याची गरज नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील दुसरबीड येथील गीतांजली मंगल कार्यालयात करण्यात आले असून, कार्यक्रमाचे उद्घाटक वामनदादा कर्डक तसेच प्रतापसिंग बोदडे यांचे पट्टशिष्य तथा दोनच राजे इथे गाजले .. गीताला अजरामर करणारे नागसेनदादा सावदेकर, तर अध्यक्षस्थानी समाजसेवेसाठी मंत्रालयातून उपसचिव पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सिद्धार्थ खरात व सामाजिक चळवळीतील मान्यवर प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.