https://vruttamasternews.com/buldhana-news-77/
संत तुकाराम महाराष्ट्राचे सांस्कृतिक बुरुज
सिद्धार्थ खरात यांचे प्रतिपादन
मेहकर/ प्रतिनिधि
संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक बुरुज असून त्यांच्या अभंगांनी जगाला कवेत घेतले आहे आणि शिवछत्रपतीची जडणघडण झाली आहे, असे प्रतिपादन निवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी जानेफळ येथे दिंडी सोहळ्यात केले.
आज दि.21 ऑगस्ट 2024 रोजी श्री संत अश्रू बाबा महाराज संस्थान जाफ्राबाद यांच्या वतीने जाफ्राबाद ते शेगाव अशी दरवर्षी दिंडी काढण्यात येते. या दिंडीच्या जानेफळ मुक्कामी सिद्धार्थ खरात यांनी समस्त वारकरी बांधव आणि भगिनींशी हृदयसंवाद साधला व आश्रुबाबा महाराज यांच्या तसबिरीचे दर्शन घेतले. संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे हजारो वारकरी पायी वारीने निघाले असता सद्या पावसाचे वातावरण असल्यामुळे वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून सर्व भाविकांना त्यांनी रेनकोटचे वाटप केले.
पुढे बोलताना सिद्धार्थ खरात म्हणाले की, महाराष्ट्राला शूर वीर तसेच थोर समाज सुधारकांची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेचे मूळ महाराष्ट्रातल्या असलेल्या विविध अध्यात्मिक चळवळीमध्ये आहे. श्री संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम व सर्व संतांच्या विचारांचा मेळा इथल्या वारकरी चळवळीत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची आराधना करत या चळवळीने महाराष्ट्रात शौर्य आणि तेज निर्माण केले यातूनच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर समाज सुधारक निर्माण झाले. आणि हिच महाराष्ट्राची ओळख आहे, म्हणून आपण हे वेगळेपण जपले पाहिजे. अश्रुबा महाराज, वरुडीचे तेजस्वी महाराज, लोणी चे सखाराम महाराज, श्री संत गजानन महाराज यांच्या वारकरी सांप्रदायाच्या चळवळीचे आपल्या भागात मुख्य केंद्र राहिले आहे. गोरगरीब व सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणीतून दुःख हरणासाठी या भजन कीर्तन आणि प्रबोधनाने मदत होते असेही त्यांनी भाष्य केले.या वेळी अमोल महाराज सरकटे यांनी सिद्धार्थ खरात यांचा सत्कार केला. सदाशिव महाराज मुंढे, गजानन महाराज ओव्हर, संजय घायाळ, पांडुरंग ओव्हर, निलेश वाघमारे,राम राजगुरू, श्रीराम ओव्हर, स्वप्निल ओव्हर, निखिलेश हाडे, गजानन मोरे आदी यावेळी उपस्थित होते.