https://vruttamasternews.com/mumbai-news-4/
विधानसभेसाठी भाजपा बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
मुंबई:/प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जवळपास 97 हजार बूथ, शक्तीकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व शक्तिनिशी महायुती एकत्रितरित्या उतरणार असून महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास श्री.बावनकुळे यांनी व्यक्त केला .
भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या 30 पदाधिकाऱ्यांच्या बैठकी बाबतची माहिती श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिली. श्री. बावनकुळे म्हणाले की विधानसभा निवडणुकीसोबतच भाजपा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागणार आहे. या बाबतची विस्तृत योजना गुरुवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आखली गेली आहे. विधानसभा निवडणुकीबरोबरच पंचायत समिती, नगर पालिका आणि महापालिका स्तरावरील नेत्यांना यथायोग्य जबाबदारी दिली जाणार आहे. महायुतीच्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पातील विशेष तरतुदी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची योजना कोअर कमिटीच्या बैठकीत ठरवण्यात आली तसेच डबल इंजिन सरकारचा अधिकाधिक लाभ राज्यातील जनतेला कसा करून देता येईल याचीही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
21 जुलै रोजी पुणे येथे पक्षाचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे या अधिवेशनाचा समारोप करणार असल्याची माहितीही श्री. बावनकुळे यांनी दिली.