https://vruttamasternews.com/pune-news-120-2/
कथक नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीचे घडविणार दर्शन
पुणे/ प्रतिनिधी
जून २०२४ मध्ये रशियातील मॉस्को शहरात होत असलेल्या ७व्या ब्रिक्स फेस्टिवलमध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाच्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे. कथकनृत्य प्रस्तुतीद्वारे रूपक नृत्यालय भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून आपल्या कला-संस्कृतीचे दर्शन जागतिक पातळीवर घडविणार आहे. रूपक नृत्यालयाची ख्याती ऐकून रशियामधील इन्स्टिट्यूट फॉर थिएट्रिकल आर्टस् आणि रशियन सरकारने नृत्यालयाला ब्रिक्स फेस्टिव्हलसाठी आमंत्रित केले असून भारताच्या विदेश मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणी सांस्कृतिक कला संचालनालयाने रूपक नृत्यालयात ब्रिक्स फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले आहे, अशी माहिती रूपक नत्यालयाच्या संस्थापिका मंजिरी कारुळकर यांनी दिली आहे…
ब्रिक्स फेस्टिवलमध्ये रूपक नृत्यालयाच्या संस्थापिका मंजिरी कारुळकर या संघाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या शिष्या ईशानी सेंजीत, मधुरा कुंटे, शांभवी शेटे, अनुष्का जाधव, भार्गवी गोसावी, साक्षी कपिल, प्रशांत राऊळ, उर्वी हडप, आर्या जोशी आणि शाल्मली साळसकर यांचा संघात सहभाग आहे. मंजिरी कारुळकर या गुरू पंडिता मनीषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या असून रूपक नृत्यालयाद्वारे पौड रोड, सिंहगड रोड आणि भूमकर चौक येथील शाखांमध्ये विद्यार्थिनींना कथक नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते.
द इन्स्टिट्यूट फॉर थिएट्रिकल आर्ट्स आणि रशियन फेडरेशनचे विदेश मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिक्स संघटनेतील देशांचा हा महोत्सव एक ते आठ जून या कालावधीत मॉस्कोमध्ये साजरा होणार आहे. यामध्ये भारतासह ब्राझील, रशिया, चीन, साउथ आफ्रिका, इराण, बेलारूस, युएई आणि इतर काही देशातले संघ सहभागी होणार आहेत. सर्व देशातील परस्परांमधील मैत्री, सामंजस्य आणि विश्वास दृढ करणे याचबरोबर सृजनात्मक कल्पना, शैक्षणिक कार्यक्रमातील समृद्धता, कला शिक्षणातील विविध पद्धती आणि सांस्कृतिक देवाण-घेवाण या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सर्व सहभागी देशातील संघांची नृत्य, नाट्य प्रस्तुती होणार आहे. सर्व संघ आपापली संस्कृती, आपल्या कलेतून सादर करून आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच सर्व संघ आयोजकांनी दिलेल्या समान विषयाचे किंवा कल्पनेचे आपापल्या शैलीतून सादरीकरण करणार आहेत. महोत्सवाच्या दरम्यान रोज रंगमंचीय कलांशी निगडित वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळांचे आयोजनही करण्यात आले आहे. सर्व संघ प्रमुखांची यात व्याख्याने होणार असून कलेविषयी मार्गदर्शनही करणार आहेत.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्व देशातले कलाकार अलेक्झांडर पुष्किन लिखित ‘द फिशरमन अॅड द फिश’ या
कथेवर आधारित नृत्यनाट्य एकाच रंगमंचावर सादर करणार आहेत. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, कर्तव्यपथावरती शास्त्रीय नृत्य सादर करण्याची कल्पना मांडली होती. त्या पहिल्याच वर्षी रूपक नृत्यलयाचा संघ संपूर्ण भारतातून आलेल्या २७० संघातून निवडला गेला होता आणि नृत्यालयाच्या संघाने कर्तव्य पथावर नृत्य सादर केले होते.
जून २०२४ मध्ये रशियातील मॉस्को शहरात होत असलेल्या ७व्या ब्रिक्स फेस्टिवलमध्ये पुण्याच्या रूपक नृत्यालयाच्या संघाला आमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती. मंजिरी कारुळकर, संस्थापिका, रूपक नृत्यालय